आजी आणि तारापुंज
लहान पणा पासून आम्ही आजीच्या खूप जवळ असू म्हणजे आजी शिवाय आमचे पान हालायाचे नाही. आजी काही शाळेत जाऊन तर शिकलेली नव्हती पण आजूबाजूशी चौकस बुद्धी व वाचनाची आवड .सदा काही ना काही करत असे . चौदा मुलांचा संसार खूप काटकसरी ने पाळला . कुठली ही वस्तू वाया जाऊ द्यायची नाही हा तिचा कटाक्ष . मातीच्या चुली पार ती फारच सुंदर घडवत असे आणि लहान लहान चुली आमच्या कडून ही घडवून घेत.
जुलै -अगस्त मध्ये आमच्या कडे भूट्याचा किस होत असे. मध्य प्रदेश च्या माळवा प्रांतात हा घरो-घरी केला जातो.
भुट्टे किसून झाल्यावर आतला कडक भाग ज्याला "माखोले" म्हणतात ते आजी वाळवून ठेवे. तेच माखोले छोट्या चुलीत पेटवून ती आम्हाला रोज सकाळी चहा करून देई .
त्या काळी आमचे घर भाड्याचे छोटे से . एक स्वयंपाकघर व एक खोली वरच्या भागात व खाली दोन छोट्या खोल्या. ती आम्हा दोघी बहिणींना घेऊन खालच्या खोलीत झोपत असे. तिला बिछान्या वर स्वच्छ पांढरी चादर लागे फाटकी असली तर ती त्याला टिपण घाले पण नवीन चादरी चा आग्रह नसे . अशी साधी शी माझी आजी खूप काही गुणांनी नटलेली.
आकाशातले तारे ती अचूक ओळखायची .आम्हाला ही शिकवत असे "हे सप्तऋषी , हा धुवतारा सदा उत्तरे कडे उगवणारा. हे नक्षत्रांचे गुच्छ . सप्तर्षी तारकासमुहातील प्रमुख सात प्रमुख तार्यांपैकी पहिल्या दोन तार्यांना जोडून सरळ रेषा आखल्यास ती रेषा सरळ उत्तर ध्रुवतार्याकडे जाईल.मृग तारकासमुहामध्ये असलेले मृगाचे तोंड नेहमीच उत्तर दिशा दर्शविते. सिंह तारकासमुहामध्ये असलेले सिंहाचे तोंड नेहमीच पश्चिम दिशा दर्शविते. असे अनेक प्रकार ती सांगत असे -शिकवत असे .
एकदा काय झाले आमच्या घरचे अलार्म घड्याळ बंद पडले. छोटे गावं लौकर सुधारून मिळाले नाही. आम्हाला सकाळी अभ्यासाला उठवणे,चहा करून देणे हा तिचा रोजच्या उपक्रमात खंड पडला नाही . आमच्या घरा समोर एक बोरी चे झाड होते ती तिची खूण त्यावर येणारे तारे बघून ती अचूक वेळ सांगे त्यामुळे आमची दिनचर्या काही बदलली नाही . तिचे वय साधारण ७५-७६ असणार नजर कमजोर झाली होती पण चष्मा लावायला तयार नव्हती .
एकदा नजर चुकीने तिनी बोरा वरचे तारपुंज बघून आम्हाला अभ्यासाला उठवले."उठा लेकींनो चार वाजून गेलेत .तास -दीड तास अभ्यास होईल. उठा लवकर . त्या दिवशी मी पहिल्यांदा उठाचा कंटाळा केला होता . तर डोक्यावर हात फिरवत म्हणे उठ बेटा दहा दिवसावर परीक्षा आली. आम्ही दोघी बहिणी उठून वर सांगितल्या प्रमाणे आजी ने मखोळे जाळून आमच्या करता चहा करून ठेवला होता तो प्यायलो व अभ्यासाला बसलो. ती आमच्या जवळ बसून काही ना काही शिवत असे . झालर लावलेल्या पिशव्या सदा नाव-नवीन तयार करत असे. त्यावेळे प्लास्टिक बैग्स कुठे होत्या .
अभ्यास करत दोन तास व्हायला आले तरी दिवस काही उजाडे ना. आम्हाला ही कंटाळा यायला लागला म्हणता आजी ने चुलीवर तापवलेले पाणी घेऊन आंघोळी पण करून झल्या पण सूर्य काही उगवेना.
बाबांना आमच्या खटपटी मुळे जाग आली. ते वरच्या माडी वरून खाली आले ,त्यांना वाटले कोणाची तरी तब्बेत बिघडली बहुतेक .खाली येऊन बघतात तर आम्ही शाळे करता तैयार . आमचे बाबा त्याच्या आईला म्हणजे आजी ला वहिनी म्हणत असे .
"अग !वहिनी अजून तर फक्त चार वाजलेत .अग! इतक्या लौकर तयार केलास मुलिंना ."
आजी एकदम ओशाळल्यागत झाली .अरे! बहुतेक मीच चुकले आज ते रोहिणी नक्षत्र बोरी वर दिसले...मला वाटले चार वाजलेत . म्हणजे आम्ही रात्री चे एक-दीड लाच उठलो असणार . "जा बाबू! तू जाऊन झोप मी बघते .परत उठवते साढे सहाला " आम्हाला जवळ घेत म्हणाली .
आम्ही तिघी झोपी गेलो .मग तर मज्जाच झाली जी झोप लागली ती सरळ आठ ला उघडली. तेही बाबांनी परत दार ठोठावल्यावर . एरवी साडे पांच ला जोरात रेडियो लावून उठवणारे आज उबरठ्या वर हंसत बसले होते .
आमची त्या दिवशी ची शाळा चुकली पण मग आजी च्या हाताची शेगडी वरची गरम-गरम पोळी त्यावर तूप -पिठी साखर खालून जी खाल्ली त्याची चव आजचे कुठलेसे पदार्थ देऊ शकत नाही.
अश्या माझ्या आजी सोबतच्या खूप गोड-गोड आठवडी तिला जाऊन जवळ-जवळ चाळीस वर्षे झाली तरी नजरे समोर तश्याच.
©नयना (आरती ) कानिटकर
No comments:
Post a Comment