Thursday, July 28, 2016

आजी ची आठवण

माझी आजी


पहूडले होते थकून-भागून
अपरान्ह समयी
लगेच डोळा लागला बहूदास्वप्नात कदाचित,
मी गेले असेन बालवयात,
तरंगले ते सारे दृष्य,जेंव्हा
मी आणायची धूण धुवू
विहीरी वरुन, तिच्या
नऊवारी लुगड्या सह
वाळत घालायचे उँच दोरी वर
दांडी ने सारत
 गोळा भरायचा  माझ्या
बारक्या  दंडात
ती बघत असायची गूप-चूप
माझे श्रम, आणि
आईने दिलेल्या दुस-या चहातले
दोन घोट चुपचाप राखायची
माझ्या करिता
पदरा आड लपवून, आईच्या नकळत
फ़िरवायची पाठी वरुन
हात प्रेमाने...
अचानक हाक ऐकू आली
आईsss काय ग! किती दमलिस
कशाला ग! काढतेस ढिग भर  कामे,
हे घे! दोन घोट चहा पी
केलाय मी, आल घालून
पाठी वर हात फिरवत
चहाचा कप पूढे केला लेकी ने
तिच्या चेह-यात चक्क आजीच दिसली
आनंदाश्रू येऊन ठाकले,
माझ्या गालांवर
खरंच
मृत्यु होतो तो शरीरांचा
आठवणी जीवंत असतात
पिढ्यांन  पिढ्या

नयना(आरती) कानिटकर
२८/०७/२०१६



No comments:

Post a Comment